ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येवरून चंद्रपुरात संताप; विद्यार्थी परिषदेचे आंदोलन, ‘ओडिशा सरकारने मौन सोडावे’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : ओडिशामधील एका महाविद्यालयात लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थिनीने स्वतःला जाळून घेतलेल्या संतापजनक घटनेचा निषेध करत चंद्रपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जटपूरा गेट परिसरात जोरदार निदर्शने केली. ओडिशा सरकारच्या दुर्लक्ष करणाऱ्या कार्यपद्धतीवर तीव्र रोष व्यक्त करत विद्यार्थिनीच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या विभागप्रमुखावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

घटनेत ओडिशाच्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्यावर होत असलेल्या मानसिक आणि लैंगिक छळांना कंटाळून टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीने आधीही अनेकवेळा तक्रारी करूनही तिच्या गुहारकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप विद्यार्थ्यांच्या संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित प्राध्यापक व महाविद्यालय प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी देशभरातून होत आहे.

चंद्रपुरातील निदर्शनात विद्यार्थ्यांनी “बेटी के इंसाफ में सरकार कहां है?”, “छळ करणाऱ्यांना शिक्षा नको का?”, “ओडिशा सरकार मौन का?” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थी परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ओडिशा सरकारने तातडीने या घटनेची चौकशी करून दोषींना अटक करावी, आणि विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.