लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
चंद्रपूर : लग्न म्हटले की डोळ्यांसमोर येतो तो झगमगाट, लाखोंचा खर्च, दागदागिने, डीजे, फोटोसेशन आणि पंचपक्वान्नांचा बेत. पण या सर्व परंपरागत दिखाऊपणाला फाटा देत चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाने समाजासमोर एक आगळीवेगळी आदर्श प्रेरणा ठेवली आहे. वरोरा तालुक्यातील सुसा या छोट्याशा गावात श्रीकांत गणपत एकुडे या तरुणाने सत्यशोधक पद्धतीने साधेपणाने विवाह करून, लग्नाचा खर्च टाळत तो पैसा गावासाठी उपयोगात आणला. या पैशातून गावासाठी अत्यंत आवश्यक असलेला पाणंद रस्ता बनवण्यात आला असून, आज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग सुकर झाला आहे.
समाजप्रबोधनातून कृतीची प्रेरणा..
श्रीकांत एकुडे हा युवक कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत कृषी व्यवसायात उतरला. चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात तो आपल्या वडिलांसोबत शेती करतो. धान, कापूस आणि गहू या मुख्य पिकांसोबतच त्याने मिरची लागवडीवर भर दिला. त्यातून तयार होणाऱ्या मिरचीच्या तिखटाला ‘सीताई’ हे आपल्या आजीच्या नावावर ब्रँडिंग करून तो विक्री करतो.
सामाजिक बांधिलकीची जाण..
फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचा प्रभाव असलेल्या श्रीकांतने ‘ब्राईट एज’ या संस्थेच्या माध्यमातून भिसी (ता. चिमूर) येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. येथे सध्या ५५ विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून त्यांच्यासाठी वाचनालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन मानून श्रीकांतने समाजासाठी काम करण्याचा ध्यास घेतला आहे.
लग्नात साधेपणा, समाजासाठी उपयोग..
श्रीकांतचे यवतमाळ जिल्ह्यातील मोझर गावातील अंजली गरमडे हिच्याशी लग्न ठरले. दोन्ही कुटुंबांत समजुतदारपणाने विवाह ठरवला गेला, मात्र श्रीकांतने स्पष्ट अट ठेवली – ना डीजे, ना हॉल, ना हुंडा, ना कोणताही फाजील खर्च. फक्त सत्यशोधक पद्धतीने विवाह आणि वाचलेल्या पैशाचा उपयोग समाजासाठी करायचा. सुरुवातीला वधू पक्षाला थोडासा संकोच वाटला, पण श्रीकांतच्या विचारांमागील सामाजिक भावनेची जाणीव होताच त्यांनी आनंदाने संमती दिली.
२८ एप्रिल रोजी सुसा गावात हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. संध्याकाळच्या वेळेस, गावातील खुल्या जागेत, ८४ नातलग व मित्रांच्या उपस्थितीत, सत्यशोधक विवाहमंत्र आणि प्रतिज्ञा यांच्यात हा विवाह सोहळा पार पडला.
पाणंद रस्ता – वर्षानुवर्षांचा प्रश्न सुटला..
सुसा गावातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी पाणंद रस्त्याचा अभाव भासत होता. बैलगाडी काय, पायदळ जाणेसुद्धा कठीण झाले होते. बी-बियाण्याच्या पोत्यांसह शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात पोहचणे मोठे आव्हान होते. अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित होता. श्रीकांतने लग्नाच्या खर्चातून हाच रस्ता तयार केला आणि एका दिवसात अनेक वर्षांची समस्या सोडवली.
पाहुण्यांकडून आहेर नको – फळझाडे व पुस्तकेच हवीत..
श्रीकांत- अंजली यांनी पाहुण्यांना स्पष्ट सूचित केले होते की, कुणीही भेटवस्तू अथवा रोख रक्कम देऊ नये. त्याऐवजी पुस्तके वा फळझाडांची रोपे द्यावीत. या आगळ्या आग्रहाला प्रतिसाद देताना पाहुण्यांनी ९० पेक्षा अधिक फळझाडे भेट दिली. यात स्टारफ्रूट, लिची, वॉटर एप्पल, चकोत्रा, बेल, मोह, रबर, मलबेरी यांसारखी विविध ३६ प्रकारची झाडे आहेत. ही सर्व झाडे श्रीकांतने स्वतःच्या शेतात लावली आहेत.
सत्यशोधक विवाह म्हणजे काय?
महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये जातपात, कर्मकांड, ब्राह्मण पुरोहित यांचा सहभाग नसतो. वधू-वर एकमेकांना प्रतिज्ञा करतात आणि सामाजिक साक्षीने हा विवाह पार पडतो. या विवाहात स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह असून, विवाहाचे संपूर्ण स्वरूप सामाजिक परिवर्तनाच्या विचारांशी सुसंगत असते.
श्रीकांत आणि अंजलीच्या विवाहसोहळ्यात वाचलेला खर्च समाजासाठी वापरण्याचा त्यांचा निर्णय अनेक नवदांपत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. या विवाहाची चर्चा केवळ सुसा गावात नाही, तर पंचक्रोशीत मोठ्या अभिमानाने केली जात आहे.