लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा (जि. गडचिरोली) : राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा निजामाबाद–जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ आज अक्षरशः तीनतेरा अवस्थेत पोहोचला आहे. दशकापूर्वी मोठ्या खर्चाने या मार्गाचे बांधकाम करण्यात आले; परंतु त्यानंतरच्या काळात दुरुस्ती वा देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आता हा महामार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता?’ अशी परिस्थिती झाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयालगतच हा महामार्ग जातो. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, विशेषतः ४० ते ५० टन वजन वाहून नेणारी ट्रक्स, कंटेनर, मालवाहू गाड्या धावतात. त्यामुळे रस्त्यावरील डांबराचे थर उखडून गेले असून, ठिकठिकाणी खोल खड्डे तयार झाले आहेत. चारचाकी वाहन चालकांसाठी तर हा प्रवास अक्षरशः जीवावर उदार होऊन करण्यासारखा झाला आहे. कोणत्या क्षणी वाहन खड्ड्यात अडकून अपघात होईल, याची शाश्वती राहत नाही. मागील काही महिन्यांपासून अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यामुळे ‘रस्ता खड्ड्यात, अधिकारी मस्त आणि नागरिक त्रस्त’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे दैनंदिन आयुष्य या रस्त्याशी जोडलेले आहे. आसरअलीसह तालुक्यातील दुर्गम गावांकडे जाण्यासाठी हा मार्गच एकमेव साधन असून, मुख्यालयापासून ३५ ते ४० किमी अंतरावरच्या गावांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना हाच रस्ता धरावा लागतो. शाळकरी मुले, रुग्णवाहिका, शेतमाल घेऊन जाणारे शेतकरी – सर्वांनाच खड्ड्यांच्या गर्तेतून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होते. नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केवळ मौन बाळगले जात असल्याने संताप वाढत आहे.
हा महामार्ग तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तेलंगणातील निजामाबादवरून हा रस्ता थेट छत्तीसगडमधील जगदलपूरपर्यंत जातो. त्यामुळे मालवाहतूक, व्यापारी उलाढाल आणि स्थानिक संपर्क या सर्व बाबींमध्ये या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण एवढ्या महत्त्वाच्या मार्गाची झालेली दुरवस्था केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेफिकीरीचे दर्शन घडवते.