पेसा क्षेत्रातील अंगणवाड्यांमधील स्वयंपाकींना मानधनात वाढ; आता मिळणार ३ हजार रुपये प्रतिमहिना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर मातांना पोषक आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकींना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे. २०१६ पासून केवळ १ हजार रुपये मानधनावर कार्यरत असलेल्या या महिलांना आता दरमहा ३ हजार रुपये मानधन मिळणार आहे.

या मानधन वाढीचा निर्णय २३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आला असून, संबंधित प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे समजते.

स्वयंपाकींना गरोदर महिलांसाठी भात, पोळी, अंडी, लाडू आदी पोषक आहार तयार करावा लागतो. यासाठी दररोज चार ते पाच तास काम करावे लागते. मात्र त्याच्या तुलनेत मिळणारे १ हजार रुपयांचे मानधन अत्यंत अपुरे होते. महागाईचा विचार करता गेली अनेक वर्षे या स्वयंपाकींनी मानधनवाढीची मागणी केली होती.

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, तसेच महिला संघटनेच्या अध्यक्ष गिताताई उईके, सचिव कल्पनाताई गायकवाड, आणि अन्य कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील महिला व बालकल्याण, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आणि आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले.

या निर्णयामुळे पेसा क्षेत्रातील हजारो स्वयंपाकींना दिलासा मिळणार आहे. यावेळी कार्यकर्त्या संगीताताई जाळे, सोनिताई ठवरे, गिताताई धुर्वे, प्रियंका रामटेके, ममताताई नाकाडे, गेडाम ताई आदींनी आपल्या भावना व्यक्त करत शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लग्नाचा खर्च वाचवून केला पाणंद रस्त्याचा विकास; एका धडपड्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी