पूराच्या पाण्यात पिकअप वाहून गेली; ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नाने दोघांचा जीव वाचला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गोंदिया : सालेकसा तालुक्यात आज भीषण घटना घडली. मुसळधार पावसामुळे बेवारटोला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कुआढास नाल्याला प्रचंड पूर आला. या नाल्यावरून जात असलेली एक पिकअप गाडी अचानक वेगवान प्रवाहात अडकून वाहून गेली. क्षणभरात मोठा अनर्थ ओढावेल असे चित्र होते, मात्र गावकऱ्यांच्या धाडसामुळे दोन तरुणांचे प्राण थोडक्यात वाचले.

ही घटना जांभळी गावाजवळ घडली. पिकअप वाहन पूराच्या लाटेत वाहून जाऊन नाल्यातील दगडाला अडकल्याने मोठा अपघात टळला. गाडीत अडकलेल्या युवकांना वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी दोरी टाकण्यात आली. ग्रामस्थांनी प्राणाची बाजी लावून केलेल्या या थरारक बचाव मोहिमेतून अखेर दोन्ही युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

सालेकसा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती नद्यांना आणि नाल्यांना मोठा पूर आला आहे. ग्रामीण भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांना नदी-नाल्यावरील प्रवाह ओलांडताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ग्रामस्थांच्या तात्काळ मदतीमुळे दोन युवकांचा जीव वाचला असला तरी या घटनेने तालुक्यातील नागरिकांना पूरस्थितीतील भीषणता जाणवली आहे. सध्या प्रशासनाने परिसरात सतर्कतेचा इशारा दिला असून, नाल्याजवळ व नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.