एक पेड मां के नाम योजने अंतर्गत गडचिरोली येथे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 07 जुले –  वृक्षलागवड सप्ताहाचे औचित्य साधून पोटेगाव रोडवरील कक्ष क्रमांक 173 मधे गडचिरोली प्रादेशिक वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली आणि जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये एक पेड मां के नाम (Plant4mother) हि योजना तसेच राज्य सरकारच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी योजना दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येते आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मार्च 2025 पर्यंत देशात 140 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असून एक पेड मां के नाम योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांनी केले.

वृक्षतोडीमुळे होत असलेल्या हवामान बदलांमुळे वाढत असलेली उष्णता आणि अनियमित पाऊस यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडे लावणे आणि वनांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन विभागीय वन अधिकारी श्री गणेश झोळे यांनी केले. एक पेड मां के नाम योजनेअंतर्गत वृक्षारोपणासाठी जवाहरलाल नेहरू शाळेतील 75 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच प्रमुख अतिथी आणि वन विभागाच्या RRT आणि PRT टीम च्या सदस्यांकडून असे एकूण 100 वृक्ष लावण्यात आले.

सदर कार्यक्रम गडचिरोली (प्रादे) वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक एस. रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, धीरज ढेंबरे आणि परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पूरमशेट्टीवार यांनी पूर्ण केला. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी गडचिरोली (प्रादे) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, RRT टीम आणि वनमजुर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे, विभागीय वन अधिकारी (तेंदू) नंदकुमार राऊत, नेहरू शाळेचे मुख्याध्यापक  सुधीर गोहणे, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्षा सौ.अंजली कुळमेथे उपस्थित होते.