लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भद्रावती (जि. चंद्रपूर): शासकीय कार्यालय म्हणजे लोकसेवेचं मंदिर. मात्र, भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयात याच लोकसेवेचा ‘खेळ’ केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कर्मचाऱ्याचा कार्यालयीन संगणकावर पत्त्यांचा खेळ खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या व्हिडिओत संबंधित कर्मचारी कार्यालयीन वेळेत, संगणकासमोर बसून ऑनलाईन पत्त्यांचा खेळ खेळताना स्पष्टपणे दिसतो. हे दृश्य एका युवकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर प्रकरणाचा भडका उडाला आहे.
या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “करदात्यांच्या पैशातून मिळालेल्या पगारावर काही कर्मचारी फक्त मजा करतात का?” असा रोष जनतेतून व्यक्त होत आहे.
स्थानिकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या व्हिडिओनंतर स्थानिक प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे समजते. मात्र, यापूर्वीही अशा प्रकारच्या शासकीय कार्यालयीन शिस्तभंगाच्या घटनांना नागरिकांना वारंवार सामोरे जावे लागत असल्यामुळे लोकांचा संयम सुटू लागला आहे.