लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने संयुक्त कारवाईत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी भामरागड परिसरात सुरक्षा दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना, इंट सेल प्राणहिता येथील अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित इसम जवानांची रेकी करत आहे. त्यानुसार पोलिस व सिआरपीएफ जवानांनी संयुक्त कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
सखोल चौकशीदरम्यान त्याची ओळख सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी, वय 38 वर्षे, रा. पोयारकोठी, ता. भामरागड अशी पटली. चौकशीतून समोर आले की, मट्टामीचा 27 ऑगस्ट 2025 रोजी कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या माओवादी चकमकीत सक्रिय सहभाग होता. त्याच्याविरोधात पोस्टे कोठी येथे दाखल अप. क्र. 02/2025 अंतर्गत गुन्हा नोंदवून 30 सप्टेंबर रोजी अधिकृत अटक करण्यात आली.
गडचिरोली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 पासून आजपर्यंत 110 माओवादी व त्यांचे समर्थक यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे हे सातत्यपूर्ण अभियान नक्षलविरोधी लढ्याला बळकटी देणारे ठरत असल्याचे दिसते.
सदर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, सिआरपीएफ उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट 37 बटालियन सिआरपीएफ दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते करत आहेत. तसेच इतर विध्वंसक कारवायांमध्ये मट्टामीचा सहभाग असल्याची पडताळणी सुरू आहे.
या मोहिमेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जाहीर आवाहन केले की, माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे व सन्मानाने जीवन जगावे. त्यांनी संकेत दिला की, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार आहे..