लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिसांनी दोन ठिकाणी एकाच दिवशी धाडसत्र राबवून तब्बल ५०.५ किलो गांजा जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण ₹५,०५,०३० रुपयांचा हा अंमली मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २४ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सुरुवात झाली ती गुप्त माहितीच्या आधारे, ज्यात सांगण्यात आलं होतं की, मौजा धनेगाव येथील कालीदास पांडुरंग मोहुर्ले याने आपल्या राहत्या घरी गांजाचा मोठा साठा करून ठेवला आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक धनेगावला रवाना झाले. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत पंचासमक्ष घराची झडती घेतली असता दोन रेघट पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्यांमध्ये गांजाची पाने, बोंडे, फुले आणि बिया असलेला ४०.८२५ किलो अंमली पदार्थ आढळून आला. त्याची एकूण किंमत ₹४,०८,२५० इतकी असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने गांजा विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याचे चौकशीत कबूल केले.
या छाप्याच्या दरम्यान पोलिसांना अजून एक माहिती मिळाली की, कातलवाडा येथील तारेश्वर भूपाल चांग याने आपल्या वडिलांच्या घरी गांजाचा साठा केला आहे. तत्काळ पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि पुन्हा पंचासमक्ष कायदेशीर झडती घेण्यात आली. त्यावेळी एका शेंदरी रंगाच्या पिशवीत ९.६७८ किलो गांजा सापडला. त्याची किंमत ₹९६,७८० इतकी होती. तारेश्वरनेही हा साठा विक्रीसाठीच ठेवला असल्याचे मान्य केले.
या दोन्ही कारवायांनंतर आरोपी कालीदास मोहुर्ले (४०, धनेगाव) आणि तारेश्वर चांग (३४, कातलवाडा) यांच्याविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी), २० (बी)(त्त्)(सी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुढे त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन) गोकुलराज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात सपोनि. समाधान दौड, भगतसिंग दुलत, सरिता मरकाम, पोना चौधरी, गरफडे, गोंगले, चव्हाण, कोडापे, दुधबडे, पंचफुलीवार, लोणारे आणि छायाचित्रकार देवेंद्र पिदुरकर यांचा समावेश होता. पुढील तपास पोउपनि. आकाश नाईकवाडे हे करीत आहेत.
या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची माहितीवर आधारित, वेगवान आणि काटेकोर पद्धतीची कृती ही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. पोलीस दलाने अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.