लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. १३ : यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (ठाणेदार) नरेश रमेशराव रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. खासगी आर्थिक व्यवहारातील पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने आपल्या मित्राला दुसऱ्या मित्राकडून १० लाख रुपये सहा महिन्यांसाठी उसनवारीने मिळवून दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदाराने १० डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पैसे परत मिळवून देण्यासाठी ठाणेदार रणधीर यांनी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने ३ लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दुपारी सुमारे २ वाजता, अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील स्वतःच्या दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना ACBच्या पथकाने रणधीर यांना ताब्यात घेतले.
आरोपी नरेश रमेशराव रणधीर (वय ५२) हे मूळचे अंमळनेर (जि. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या यवतमाळ येथे कार्यरत होते. त्यांच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे व पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, स्वप्निल निराळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली..