पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

  • जिल्ह्यातील पहिले आयएसओ नामांकन.
  • विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

पोंभुर्णा दि .१२ मार्च  : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज संस्थेची संकल्पना साकार व्हावी व त्यांचे बळकटीकरण व्हावे या हेतूने ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावर पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्यात येते.

यंदा जिल्ह्यातील लोकाभिमुख कार्य करणारी पोंभुर्णा पंचायत समीती यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात उत्कृष्ठ कार्य करुन द्वितीय पुरस्कार प्राप्त ठरली आहे. विशेषता जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ नामांकित ही पंचायत समीती असून या पुरस्कारामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

७३ व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज संस्थांना मिळालेल्या अधिकारामुळे ग्रामिण भागातील शेवटच्या माणसाला सत्तेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या अनुषंगाने पोंभुर्णा पंचायत समीतीने सन २०१९-२० सत्रात अधिकाधिक लोकाभिमुख कार्य मुख्य कार्यकारी आधिकारी राहूल कर्डीले, पंचायत समीती सभापती अल्काताई आत्राम, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपुर्ण परिश्रमाने हा पुरस्कार पटकावला आहे.

या पंचायत समीती अंतर्गत ग्रामपंचायत घाटकुळ महाराष्ट्र राज्यात आदर्श गांव म्हणून पुरस्कार प्राप्त ठरले असून नुकतेच जिल्हा स्मार्ट व सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित झाले आहे. ग्रामपंचायत आष्टा पंचायत सशक्तीकरण अभियानात देशात अव्वल आले आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत पेपरलेस झाल्या असून ११ ग्रामपंचायती व ७४ अंगणवाडी केंद्रांना आय.एस.ओ मानांकन मिळाले असून पारदर्शी प्रशासनाचे हे निकष आहेत. पोषण चळवळ उत्कृष्ठ राबविल्याने कुपोषणमुक्त तालुका होण्याचे चित्र आहे.

नरेगा व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेली कामे ग्रामीण विकासाला दिशादर्शक ठरली आहे. पंचायत समिती स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे, शुध्दजल, अभ्यागतकक्ष, स्वच्छता संदेश, योजना फलकचे निर्माण करण्यात आल्याने ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळत आहे. आक्षेपपुर्ती प्रमाण सुद्धा ८०% प्रमाणात आहे. कर्मचाऱ्यांत उत्साह कायम राहावा म्हणून नियमितपणे विविध उपक्रमशिल कार्यक्रमाचे आयोजन होत असून कार्यसंस्कृतीची बिजे रुजली आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीत वाढ झाल्याचे दिसून येते.

कोरोनाचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा व जनतेत जागृत्ती व्हावी हा हेतु ठेऊन ‘माझे कुटूंब,माझी जबाबदारी’ वर आधारित संदेशात्मक ‘आरोग्यावर बोलू काही’ पुस्तक प्रकाशित करणारी महाराष्ट्रातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.

या अभियानात जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवर्ग, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदननिस, ग्रा.प.कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होवून सर्वोतोपरी सहकार्य केल्याने पंचायत राज अभियानात गौरवाची मानकरी पंचायत समिती ठरली आहे असे पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी सांगितले.

•••••