लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार, गडचिरोली : आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले अजूनही अपूर्णच आहे. प्रकल्पाचे वेळापत्रक, गुणवत्ता, व देखभाल या तिन्ही बाबतीत प्रशासनाने अक्षरशः निष्काळजीपणाचे दर्शन घडवले आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आज ‘रस्ता’ म्हणजे ‘दैनंदिन संकट’ वाटू लागले आहे. विशेषतःरेपनपल्ली–जिमलगट्टा–उमानूर या मार्गावर वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
खड्डे की खोल चिखलदऱ्या? असा प्रश्न पडावा, इतक्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी साठले असून त्याचा खोल अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. किरकोळ अपघात तर रोजचेच झाले असून भविष्यात एखादा जीव गमवावा लागला, तर त्याचे उत्तरदार कोण? हे प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनात खोलवर रुतले आहेत.
डांबरीकरणाचे नावीन्य दाखविण्यासाठी रेपनपल्लीजवळ केलेल्या दुरुस्त्या पावसाच्या पहिल्याच सरीत उखडल्या गेल्या. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाचा पाण्यात झाला! प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अभियंत्यांना दिले होते. मात्र हे आदेशही ‘कागदावरचे आदेश’ ठरले. आजवर कोणताही अधिकारी या मार्गाची पाहणीसाठी फिरकलेला नाही, ही वस्तुस्थिती असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, मालवाहतूक करणारे ट्रक्स, तसेच दूरवरील गावांशी संपर्क ठेवणारे नागरिक प्रवास करत असतात. अशा स्थितीत जर एखादा गंभीर रुग्ण वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचला नाही, तर त्याचा जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ रस्त्यांची नाही, तर माणसाच्या जिवाचीही येथे थट्टा होत आहे.