एटापल्लीत तज्ञ डॉक्टर अभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; शवविच्छेदनासाठी अहेरीला रवाना

नवीन वर्षात आरोग्याची उडाले धिंडवडे....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगे (वय २५) या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, स्थानिक रुग्णालयात तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे शवविच्छेदनासाठी मृतदेह तब्बल ३० किलोमीटर दूर अहेरी येथे हलवावा लागल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मृत महिलेच्या नातेवाइकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

प्राथमिक माहितीनुसार आशा किरंगे या सात ते आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला अचानक तीव्र सूज येऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हेडरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार मृतदेह ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र या रुग्णालयात स्त्रीरोग व बालरोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे शवविच्छेदन करता आले नाही. परिणामी मृतदेह अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेचा गर्भासह मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी स्त्रीरोग व बालरोग तज्ञांची उपस्थिती आवश्यक असते. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हे तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह अहेरी येथे पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता, असे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तपेश उईके यांनी सांगितले.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची अनुपलब्धता ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या विकासाबाबत शासनाकडून सकारात्मक दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Aheri hospitalGadchiroli hospital issuesPoor health facilitiesWoman delthएटापल्ली