प्रेमीयुगुलाची गुंडलवाडी शिवारात एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या!

  • मुलीचे विवाह ठरल्याने….. त्या दोघांनी घेतला आत्महत्येचा निर्णय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

हिंगोली, दि. ९ एप्रिल: जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडालवाडी शिवारामध्ये प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. अजय केशव डुकरे (१६) व सरस्वती कऱ्हाळे (१८) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील अजय केशव डुकरे यांच्या शेतात हळदीच्या पिकाची काढणी सुरु आहे. त्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी जागरण करण्यासाठी जावे लागते. त्यानुसार गुरुवारी ता. ८ एप्रिल ला  रात्री १० वाजता अजय घरी जेवण करून शेतात जागरण करण्यासाठी जातो असे सांगून शेतात गेला. तो नेहमीच शेतात जात असल्याने घराच्या मंडळींनीही त्याला परवानगी दिली होती.

दरम्यान, आज सकाळी काही शेतकरी शेतात जात असतांना केशव डुकरे यांच्या शेतात एका झाडाला एक मुलगा व एका मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. सदर प्रकार गावात कळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी पाहणी केली असता अजय डुकरे व सरस्वती कऱ्हाळे या दोघांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुडेकर, जमादार भगवान वडकिले यांचे पथक घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा मृतदेह हा नजीकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.   

दरम्यान मयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. तर सरस्वती कऱ्हाळे यांचे वडिल गावातच सालदार म्हणून काम करतात. तर सरस्वती कऱ्हाळे यांचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबिय आज त्यांच्या मुळगाव औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी येथे जाणार होते. त्या ठिकाणी राहून लग्नाची तयारी करणार होते. मात्र त्यापुर्वीच हा प्रकार घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Sucide Case