लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हिसार, १० जुलै : संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा सन्मान केला जात असताना हरियाणातील हिसार जिल्ह्यात मात्र शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बास बादशाहपूर येथील करतार मेमोरियल सीनियर सेकेंडरी स्कूलचे मुख्याध्यापक जगबीर सिंग (वय ५०) यांची दोन विद्यार्थ्यांनी भर शाळेत चाकूने वार करून निर्घृण हत्या केली.
सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पस हादरून गेला असून, शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भय व संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
हिसार जिल्ह्यातील हाँसी पोलीस अधीक्षक अमित यशवर्धन यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघे आरोपी विद्यार्थी बारावी वर्गात शिकत होते. मुख्याध्यापक सिंग यांनी काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांना शिस्तीचा सल्ला देत केस नीट कापून येणे, पोशाखातील अनियमितता टाळणे व शालेय आचारसंहितेचे पालन करणे याबाबत ताकीद दिली होती. या सूचनेचा राग मनात धरून विद्यार्थ्यांनी आज सकाळी सिंग यांच्यावर फोल्डिंग चाकूने एकापाठोपाठ एक वार केले.
गंभीर जखमी अवस्थेतच ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही आरोपी मुख्याध्यापकांवर हल्ला करून धावत सुटताना स्पष्टपणे दिसून येतात. सध्या पोलिसांनी दोघांनाही अल्पवयीन कायद्यांतर्गत ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा तणाव असून, शाळा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पालक वर्गामध्ये देखील भीती आणि संतापाची भावना दिसून येत आहे.