पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्याला प्राधान्य द्या

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 19 जुले – पावसाळा सुरू झाला आहे आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी नाले असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ता वाहतूक बंद होते. मात्र पर्यायी रस्त्याने, किंवा पाणी ओसरल्यावर खराब रस्त्याची डागडुजी करून, कच्चा रस्ता वाहून गेला असल्यास तेथे पुन्हा मुरूम टाकून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज दिल्या
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आपत्ती व्यवस्थापन समितीचे बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
गरोदर महिला, सर्पदंश व वीज अपघात झालेले नागरिकांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते अशावेळी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असणे आवश्यक आहे. विशेषतः आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या भागात विशेष लक्ष देण्यात यावे. सिरोंचा ते तेलंगणा मार्गावरील पुलाचा पोहचरस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील परिस्थितीचा विचार करून रुग्णांना इतरत्र रेफर करावे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी आपत्ती ओढवली असेल तेथे स्थानिक यंत्रणेने स्वतः हजर राहावे , आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नागरिकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी. तहसीलदार यांनी झालेला नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घ्यावे तसेच जीवित हानी झाली असल्यास त्यासंबंधी मृतकाच्या वारसांना व पशुधन मालकांना देय शासकीय मदतनिधी तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.