लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी गडचिरोली तालुक्यातील लांझेडा, अडपल्ली, गोगाव, महादवाडी, काटली, मोहझरी पॅच आणि साखरा या सात गावांमधील खाजगी जमिनींची थेट खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या प्रकल्पाअंतर्गत काही शेतकऱ्यांची रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना भूसंपादनाची रक्कम जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि विशेष भूसंपादन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते धनादेशाद्वारे वितरित करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, संबंधित सात गावांतील सर्व भूधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांच्या कार्यालयात हजर राहून तात्काळ रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून प्रकल्पास गती मिळू शकेल.