लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २१ : नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) अन्वये राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापक व प्राध्यापकांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि श्री चैतन्य हेल्थ अँड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको व्हीलेज (GEV), पालघर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराच्या निमित्ताने भारतीय मूल्याधिष्ठित ज्ञानप्रणाली आणि शैक्षणिक नेतृत्व विकास यांसारख्या क्षेत्रात अध्यापकांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
भारतीय मूल्यांचा अभ्यास करून नेतृत्वक्षम शिक्षक घडवणार…
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात हा करार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र भारुड, व्यवस्थापक शंतनु पवार, केंद्रप्रमुख मिथीलेश भाकरे, कार्यकारी सहायक सलीम सय्यद आणि गोवर्धन इको व्हीलेजचे प्रतिनिधी नवल जीत कपूर, अनुप गोयल आणि संजय भोसले हे उपस्थित होते.
GEV तर्फे भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित प्रशिक्षण..
या प्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गोवर्धन इको व्हीलेज ही संस्था भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) व नेतृत्व विकास यावर विशेष भर देऊन अध्यापकांना प्रशिक्षण देते. अशा उपक्रमांमुळे अध्यापकांचा शैक्षणिक दृष्टिकोन मूल्याधिष्ठित व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होईल.
तसेच नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत असून, त्यानुसार प्राध्यापकांचे समग्र व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व क्षमता, भारतीय तत्त्वज्ञानाशी सुसंगत विचारपद्धती आणि शाश्वत विकास ध्येय यावर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तनाची दिशा…
या सामंजस्य करारामुळे अध्यापक प्रशिक्षणासाठी GEV चा अनुभव आणि महाराष्ट्र शासनाची धोरणे यांचा लाभ घेता येईल. पारंपरिक भारतीय शिक्षणमूल्यांवर आधारित, आधुनिक व्यवस्थापन व अध्यापन कौशल्यांचा समन्वय साधत नव्या युगातील शिक्षक घडवण्याचा हा प्रयत्न आहे.