चक्रीवादळ व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या

कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ४ मे: नुकत्याच आलेल्या चक्रीवादळ व गारपीटीसह झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा आरमोरी तालुक्याला बसला असल्याने उन्हाळी धान, मका, आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

१ मे महाराष्ट्र दिनी रात्रौ आरमोरी तालुक्यात मेघगर्जनेसह चक्रीवादळ व गारपीटीसह वादळी पाऊस झाला. या पावसाने आरमोरी, अरसोडा, रवि, मुलूरचक, जोगीसाखरा, पळसगाव शंकरनगर, रामपूर, कणेरी व इतर अनेक भागातील उन्हाळी धान, मका, आंबा व इतर पिकाचे अतोनात नुकसान झाले.

आरमोरी तालुक्यातील विविध भागातील उभे व अंतिम टप्प्यात कापणीच्या स्थितीत आलेले अनेक शेतकऱ्यांचे धान पीक वादळी पावसाने जमिनीला टेकले असल्याने धानपिकाची नासाडी झाली आहे. तसेच मका पिकाचेही नुकसान झाले. आंबा व इतर फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक घरावरचे कौले व छप्पर उडाले. सदर नुकसान झालेल्या अरसोडा, रवी व मुलूरचक भागाला भेट देऊन कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी नुकसानीची पाहणी केली.  

चक्रीवादळ व गार पिटीसह झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने लगातर सुरू असलेल्या संकटाच्या मालिकेने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. आर्थिक संकटाचा सामना करित असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी कांग्रेसचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी यांनी  राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व मदत आणि पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार याना पाठवलेल्या निववेदनातून केली आहे. नुकसानीची पाहणी करतेवेळी त्यांच्यासोबत शालीक पत्रे व अनेक शेतकरी उपस्थित होते.

Tejas Madavi