“गर्भलिंग निदानाची माहिती द्या, मिळवा ₹१ लाखांचे बक्षीस; ओळख राहील गोपनीय”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली दि. १७ मे : गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणीही व्यक्ती गर्भधारणेपूर्वी किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करत असल्याची खात्रीशीर माहिती दिल्यास संबंधित माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी दिली.

विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाणार असून, कोणतीही वैयक्तिक हानी होणार नाही, याची प्रशासन पूर्ण काळजी घेणार आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांपासून ते शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनाही लागू आहे.

कायद्यानुसार गंभीर गुन्हा

गर्भधारणेपूर्व किंवा प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे किंवा त्यास मदत करणे हे गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४ व सुधारित कायदा २००३ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी किंवा इतर संबंधित व्यक्तींवर १ लाख रुपयांचा दंड आणि २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

नागरिकांनी पुढे यावे :

प्रशासनाचे आवाहन गर्भलिंग निदान करणाऱ्या बेकायदेशीर व्यक्ती, संस्था किंवा केंद्रांची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही माहिती पुरवण्यासाठी खालील माध्यमांचा वापर करता येईल :

हेल्पलाइन क्रमांक : १८००२३३४४५४५ / १०४

संकेतस्थळ : http://amchimulagimaha.in

प्रत्यक्ष संपर्कासाठी : जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली

गर्भलिंग निवडीसारख्या सामाजिक व कायदेशीरदृष्ट्या अपराध ठरविणाऱ्या कृतींविरोधात जनतेने सजग राहावे आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. माधुरी किलनाके यांनी केले आहे.

“मुलगी ही भार नाही, आधार आहे” हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सजग नागरिकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे,” असेही त्या म्हणाल्या.