लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित स्टील प्लांट, खाणी आणि पायाभूत प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींवर घाला घालण्याचा आरोप करत डाव्या लोकशाही पक्षांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर तीव्र टीका केली. “रोजगाराच्या गाजराखाली जिल्हा भांडवलदारांच्या हवाली केला जात आहे,” असा आरोप करत शेतकऱ्यांनी सावध राहून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
स्थानिक सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डाव्या आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भेंडाळा, जैरामपूर, अडपल्ली, येवली-शिवणी या भागांत सुरू असलेले भूसंपादन हे केवळ सुरुवात असून, येत्या काही वर्षांत संपूर्ण जिल्ह्याच्या शेतीवर मोठा परिणाम होणार आहे. “सत्ताधारी भाजप आणि संधीसाधू काँग्रेस—दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर खाणी व उद्योगांना पाठिंबा देत हा मार्ग मोकळा केला,” असा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा देताना नेत्यांनी सांगितले की, सुरजागडसह अनेक ठिकाणी लोहखाणींची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे, तर हेडरी, कोनसरी, वडलापेठा येथे स्टील प्रकल्प उभारणी सुरू आहे. पुढील ५ ते ६ वर्षांत शंभरेक स्टील व सिमेंट प्रकल्प उभारले जाण्याची शक्यता असून, त्यासाठी किमान १ लाख २० हजार एकर खासगी शेती भूसंपादित होऊ शकते. याशिवाय विमानतळ, रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि मायनिंग कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांसाठी आणखी २५ ते ३० हजार एकर जमिनी जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
“जिल्ह्यातील ६५ ते ७० टक्के शेती भविष्यात भूसंपादनाच्या कक्षेत येऊ शकते,” असा गंभीर इशारा देत, शेतकऱ्यांनी ‘साप-नाग’ राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. “जे पक्ष आज शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत, तेच कालपर्यंत खाण व उद्योगांच्या समर्थनात होते,” अशी टीका करत, आंदोलनांच्या वेळी राजकीय स्वार्थासाठी घेतलेल्या भूमिका उघड करण्यात आल्या.
एट्टापल्लीतील २०२२ मधील आंदोलनाचा उल्लेख करत, “हितसंबंध जुळताच आंदोलनांकडे पाठ फिरवणारे नेते आता शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे दाखवत आहेत,” असा आरोपही करण्यात आला. “ही केवळ सत्तेची आणि पैशांची राजकारण आहे; शेतकऱ्यांचे हित दुय्यमच राहिले आहे,” असा सूर पत्रकार परिषदेत उमटला.
डाव्या आघाडीने ‘गडचिरोली जिल्हा खनिज विकास प्राधिकरणा’विरोधात एकत्रित लढा उभारण्याचे आवाहन करत, सर्व शेतकऱ्यांनी खाण-विरोधी चळवळीत सहभागी होण्याची गरज अधोरेखित केली. “जमिनी वाचवायच्या असतील, तर आता निर्णायक लढा देण्याशिवाय पर्याय नाही,” असा इशाराही देण्यात आला.
पत्रकार परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. महेश कोपूलवार, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.