रायगड: पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सोयीसुविधांची पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १३ एप्रिल: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती सुनिल तटकरे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन तेथे नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर येथील नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करतांना त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.

या नवीन इमारतीत कोविड रुग्णांसाठी शंभर बेडची सोयीसुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

   यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

     या पाहणीदरम्यान पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नागरिकांना मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात स्वच्छ धुवा, घराबाहेर अत्यावश्यक कारणांशिवाय पडू नये, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, ४५ वर्षावरील वय असलेल्या नागरिकांनी आपले लसीकरण त्वरित करून घ्यावे,असे आवाहन केले.

    यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पोलीस अधीक्षक अशोक दुधे,  उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता मोरे, तहसिलदार सचिन शेजाळ, डॉ.गजानन गुंजकर व जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Aditi Sunil Tatkare