गडचिरोलीत पावसाचा कहर : भामरागडचा संपर्क तुटला, १९ वर्षीय तरुण वाहून गेला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: जिल्ह्यात पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भामरागड तालुक्यातील परलोकोटा, पामुलागौतम इंद्रावती तिन्ही नद्यांच्या रौद्ररूपामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. १८ ऑगस्टच्या रात्री पार्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) ठप्प झाला आहे. त्यामुळे तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी तसेच बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

दरम्यान या पुराच्या धुमश्चक्रीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा हा काल दुपारी साडेचारच्या सुमारास खंडी नाला ओलांडत असताना प्रचंड पुराच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती होताच प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली असून तरुणाचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी दिली आहे.

पावसामुळे अनेक गावांचा संपर्क खंडित झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.आपत्ती व्यवस्थापन ने मार्फत नागरिकांना सतर्क करण्यात आले असून कुठलेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने जागोजागी बंदोबस्त वाढवला आहे. बाजारपेठा ओस पडल्या आहेत तर नागरिक घरातच बसले आहेत. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिलास मार्ग मोकळे होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तन्यात येत आहे..

Bhamragad flood