लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील रायगट्टा गावचा सुपुत्र रवींद्र भंडारवार राज्यात प्रथम क्रमांकाने ‘सहाय्यक आयुक्त समाजकल्याण’ पदासाठी निवड
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी नक्षलबहुल पट्ट्यातील रायगट्टा या लहानशा खेड्यातून शिक्षणाचा दिवा लावणाऱ्या रवींद्र सत्यं भंडारवार यांनी स्वतःच्या जिद्दी, चिकाटी आणि अखंड परिश्रमाच्या जोरावर असे यश संपादन केले आहे, जे आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहे. अत्यंत प्रतिकूल आणि मर्यादित परिस्थितीत शिक्षण घेत, शासकीय सेवेत कार्य करत असतानाही अभ्यासाची मशाल सतत प्रज्वलित ठेवणाऱ्या या तरुण अधिकाऱ्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ‘सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण गट-अ’ या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे.
सध्या ते बल्लारपूर नगरपरिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या शांत, सौम्य आणि कार्यतत्पर स्वभावामुळे ते सर्वत्र आदराचे केंद्र बनले आहेत.
दुर्गमतेतून उभारलेला शिक्षणप्रवास…
रवींद्र भंडारवार यांचे बालपण गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील रायगट्टा गावात गेले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण भगवंतराव आश्रम शाळा राजाराम आणि राजे धर्मराव हायस्कूल, महागाव येथे पूर्ण केले. पुढे विज्ञान शाखेतून राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथून बारावी उत्तीर्ण करत त्यांनी शिक्षणाचा पाया अधिक मजबूत केला. त्यानंतर डी.एड., बी.एड. आणि एल.एल.बी. अशा व्यावसायिक पदव्या घेत त्यांनी शिक्षणक्षेत्रात सखोल पाय रोवले.
फक्त एवढ्यावरच त्यांनी समाधान मानले नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), नवी दिल्ली येथून त्यांनी बी.ए., एम.ए. (इतिहास), एम.एस्सी. (रसायनशास्त्र) आणि एम.एस.डब्ल्यू. (समाजकार्य) अशा चार पदव्या प्राप्त केल्या. इतिहास आणि समाजकार्य या दोन्ही विषयांत त्यांनी SET परीक्षाही उत्तीर्ण केली आहे — हे त्यांच्या अखंड अभ्यासू वृत्तीचे प्रतीक आहे.
सेवाव्रताचा प्रेरणादायी प्रवास..
२०१० साली त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर २०१५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI), २०१७ मध्ये मंत्रालय सहाय्यक आणि अन्न व पुरवठा निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत काम करत त्यांनी प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. २०१९ मध्ये नगरपरिषद उपमुख्याधिकारी म्हणून राज्य संवर्ग सेवेत त्यांची निवड झाली. या सर्व टप्प्यांवर त्यांनी प्रत्येक पदाला सेवेचे माध्यम मानले, सत्तेचे स्थान नव्हे.
आज राज्यात प्रथम क्रमांकाने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गट ‘अ’ पदावर निवड मिळवणे हे त्यांच्या समर्पण, संयम आणि सातत्याचे प्रतीक आहे.
कुटुंबाचे संस्कार – प्रेरणेची माती…
त्यांचे वडील एक साधे शेतकरी आणि आई गृहिणी. घरची परिस्थिती मर्यादित असली, तरी दोघांनी मुलाच्या शिक्षणावर कधी तडजोड केली नाही. “शिक्षण हेच खरे भांडवल” या विश्वासाने त्यांनी मुलाला प्रत्येक पावलावर साथ दिली. रवींद्र भंडारवार आपल्या यशाचे श्रेय आई–वडील, पत्नी, मुले, भाऊ–बहिण, वहिनी आणि मित्रपरिवार यांना देतात. त्यांच्या आयुष्याची कहाणी म्हणजे “संघर्षातून सिद्धी” या उक्तीचे जिवंत उदाहरण आहे.
समाजाशी नाळ जोडलेली…
नक्षलप्रभावित प्रदेशात वाढलेल्या भंडारवार यांना ग्रामीण जनजीवन, शिक्षणातील विषमता आणि सामाजिक अन्यायाची खरी जाणीव आहे. म्हणूनच समाजकल्याण विभागात प्रवेश ही त्यांच्यासाठी केवळ नोकरी नसून कर्तव्यपूर्ती आणि समाजसेवेचे माध्यम आहे. कर्तव्यनिष्ठा, सौजन्य आणि उपक्रमशीलतेमुळे त्यांनी अल्पावधीतच उत्तम प्रशासक म्हणून आपली छाप निर्माण केली आहे.
जिद्द, अभ्यास आणि आत्मविश्वासाचा विजय…
दररोजच्या संघर्षातही त्यांनी अभ्यास सोडला नाही. दिवसाचा थकवा आणि जबाबदाऱ्यांचा ताण यांच्यावर मात करत त्यांनी स्वप्नांच्या दिशेने चालत राहिले. आज त्यांचे यश केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.