रेड अलर्ट; दक्षिण गडचिरोलीतील या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी – जिल्हाधिकाऱ्यांचा आपत्कालीन निर्णय..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दी,२५ जुलै : भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २५ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केला असून, जिल्ह्याच्या दक्षिण भागात—विशेषतः अहेरी, भामरागड, मुलचेरा, चामोर्शी आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये—अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीचा निर्णय घेत २५ जुलै रोजी या तीनही तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

हा निर्णय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशानुसार घेतला गेला असून, यामागील प्रमुख उद्दिष्ट कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका टाळणे हे आहे.

२४ जुलै रोजीच जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली असून, काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षणसंस्थांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाने संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तात्काळ तयारीत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा दिरंगाई अथवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन…

▪️ विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी सुट्टीबाबत जागरूक राहावे.

▪️ नदी-नाले, पूल यांच्याजवळ जाणे टाळावे.

▪️ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

▪️ अडचण असल्यास जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

Aheri school offGadchiroli rainfallGadchiroli weather updateHevey rainfallSchool closed