लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दी २४ जुलै: भारतीय हवामान विभागाने गडचिरोलीसाठी २४ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट आणि २५ जुलैसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
२४ जुलै रोजी जिल्ह्यात १५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नदी, नाले, तलाव व बंधाऱ्याजवळ जाणे टाळावे. पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. पर्यटकांनी अत्यंत दक्षता बाळगावी आणि सेल्फीचा मोह टाळावा.
वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी उपखोऱ्यांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना विशेष सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन संपर्कासाठी:
दूरध्वनी – 07132-222031 / 222035
मोबाईल – 9423911077 / 8275370208 / 8275370508
सुरक्षितता बाळगा, प्रशासनासोबत सहकार्य करा!