लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३ : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती व पीक कर्जावरील सर्व प्रकारचे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. महसूल व वन विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रानुसार हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना करावे लागणारे करारनामे, हक्कविलेख निक्षेप, तारण गहाणखत, हमीपत्र, गहाण सूचना पत्र किंवा घोषणापत्र अशा कोणत्याही कायदेशीर दस्तऐवजांवर आता मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे कर्ज प्रक्रियेत येणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी होऊन शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.
विशेषतः अल्पभूधारक, सीमांत व गरजू शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार असून, पीक कर्ज मिळवण्यातील अडथळे कमी होऊन शेतकऱ्यांना वेळेत भांडवल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कर्जप्रक्रिया सुलभ होऊन शेतीसाठी आवश्यक निविष्ठा खरेदी करणे शेतकऱ्यांना अधिक सोपे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाचा हा निर्णय शेती क्षेत्राला बळकटी देणारा असून, पीक कर्जाशी संबंधित प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी या सवलतीचा फायदा घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण काही अंशी कमी होणार असून, कृषी क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.