गडचिरोली येथील बायपास रस्त्यासाठी माजी खा.अशोक नेते यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित आणि आकांक्षित जिल्ह्याला भविष्यातील वाहतूक अडचणींपासून वाचवण्यासाठी स्वतंत्र बायपास रस्त्याची तातडीने गरज निर्माण झाली आहे. सतत वाढणाऱ्या अवजड वाहतुकीच्या दडपणामुळे शहरातील मुख्य रस्ते हादरू लागले आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी खा. आणि भाजप अनुसूचित जनजाति मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन या बायपास मार्गाच्या मंजुरीसाठी थेट निवेदन सादर केले.

गडचिरोली हा जिल्हा छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांना जोडतो, तर सुरजागड आणि कोनसरीसारखे खनिज प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने मोठा भार निर्माण करत आहेत. त्यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण वाढले असून, रुग्णवाहिका, शालेय वाहने, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान गडकरी यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना बायपास रस्त्याचे महत्त्व ओळखून त्यासाठी तातडीने निधी आणि मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. डॉ. अशोक नेते यांनी या आश्वासनाच्या स्मरणासह गडचिरोलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

त्यांनी स्पष्ट केले की हा रस्ता केवळ वाहतूक सोयीपुरता मर्यादित नाही, तर गडचिरोलीच्या नागरी विकासाला चालना देणारा, जीवनरक्षक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून आवश्यक असलेला उपाय आहे. या मार्गामुळे शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने होऊ शकेल, तसेच भविष्यातील औद्योगिक वाढीला योग्य आधार मिळेल.

या महत्त्वपूर्ण निवेदनप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सामाजिक नेते धनंजय पडीशाल्लवार, आदिवासी आघाडीचे आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, युवा नेते सारंग साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ashok neteGadchiroli accidentGadchiroli bypass roadGadchiroli traficNITIN GADKARI