पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश, 16 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 20 जुलै – खालापूर येथील इर्शाळवाडी येथे घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे. डोंगराचा कडा तुटला आणि इर्शाळवाडी गावावर कोसळला. गावात 40 ते 45 घरं होती. या घरांमध्ये जवळपास 200 ग्रामस्थ वास्तव्यास होती. पण संपूर्ण गावावर दरड कोसळली आणि हाहा:कार उडाला. गावातील फक्त पाच ते सहा घरं वाचली. या संकटातून जे दहा ते बारा गावकरी वाचले त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत आपल्या माणसांना दरडीच्या ढिगाऱ्यात अडकताना पाहिलं. अनेकांनी वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला. पण संकट फार मोठं होतं. एकीकडे मुसळधार पाऊस सुरु आहे.

रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं. अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. येथे जाण्याची वाट अतिशय कठीण आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दुर्घटना स्थळी स्वत: पायी जाण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ”रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्थानिक नागरिकांना   केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी काही तरुण स्वतःहून पुढे आले आहेत. रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच नागरिकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहून 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत.”

हे पण वाचा :-

#HeavyRainfall#IrshalwadiLandslide#KhalapurCM eknath shinderaigad