लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १७ जून : राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन वर्षांत एक कोटी ११ लाख वृक्ष लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करून सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, श्री. कार्तिक, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, कुशल जैन, नमन गोयल, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनासाठी शासनाने १ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे, लॉईड मेटल्स कंपनीमार्फत स्वतंत्रपणे ११ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, औद्योगिक विकासासोबत पर्यावरण रक्षणालाही बळकटी देण्याचा दुहेरी उद्देश आहे.
वृक्षारोपण म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे, तर ती झाडे टिकवणे, वाढवणे, त्यांचे संगोपन करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी अधोरेखित केले. यासाठी किमान दीड ते तीन वर्षांचे रोपे निवडावीत, टिकावू प्रजातींची निवड करावी, तसेच भविष्यातील लागवडीसाठी स्थानिक नर्सरीतून रोपे विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत रेशीम विभाग, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास, आरोग्य व शिक्षण विभाग अशा विविध शासकीय विभागांसह सामाजिक संस्थांना विशिष्ट वृक्षलागवडीची उद्दिष्टे देण्यात आली. “केवळ सरकारी योजना म्हणून नव्हे, तर लोकचळवळीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.