लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या हालूर गावाने समाजपरिवर्तनाचा ऐतिहासिक पाऊल उचलत एकमुखाने दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. या निर्णयाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महिलांचा सक्रिय पुढाकार.
लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ)च्या व्यसनमुक्ती मोहिमेच्या प्रेरणेने गावातील महिलांनी दीर्घकाळापासून दारू सेवनामुळे निर्माण होणाऱ्या कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या, आर्थिक अस्थिरता आणि रस्ते अपघात यांसारख्या गंभीर आव्हानांविरुद्ध ठाम भूमिका घेतली. ग्रामसभा बोलावून महिलांनी एकत्रित संकल्प करत गाव दारूमुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. ग्रामस्थांनी या प्रस्तावाला प्रचंड प्रतिसाद देत एकमुखाने ठराव मंजूर केला.
या ठरावामुळे गावातील सामाजिक सौहार्द, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य वाढेल, तसेच विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दारूबंदीच्या या निर्णयासाठी सरपंच श्रीमती अरुणाताई मधुकर सडमेक, पाटील लच्चू हेडाऊ, भूमिया धनसू होडे, महिला मंडळ अध्यक्षा कलावती तिरकी, उपाध्यक्षा फुलसिना एक्का, सचिव बाली हेडो, तसेच नवरी हेडो, शांती कुड्येती, तानी हेडो, जमाता हेडो, गीता हेडो, चमेली मिंज, विमला किंडो, फुलवती टोप्पो, तेरेसा टोप्पो, सविता टोप्पो, सविता बडा, किलसीता रिका, सावित्री आत्राम, बाली आत्राम, अनिता मिंज, इर्पे आत्राम, प्रतिमा तिग्गा, संजना हेडो, रजनी हेडो, कुम्में हेडो, शिवानी गेडाम आणि ग्राम संपर्क केंद्राचे कर्मचारी किशोर गावडे यांसह अनेक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
हालूरच्या महिलांनी दाखवलेला हा सामूहिक निर्धार आणि बदलाची जिद्द केवळ गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. व्यसनमुक्तीच्या दिशेने महिलांच्या नेतृत्वातून उभा राहिलेला हा आदर्श गडचिरोलीच्या ग्रामविकासाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण पान जोडणारा ठरला आहे.