सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी दादाजी दुर्गे यांचे दुख:द निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २५ एप्रिल: सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. दादाजी दुर्गे (६४) यांना कोरोनाचे लागण झाल्याने अहेरी येथील विलगीकरण कक्षात उपचार सुरु होते. मात्र अचानकच श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान आज दि. २५ एप्रिल रोजी दादाजी दुर्गे यांनी अखेरचा श्वास घेतला.

दादाजी दुर्गे यांचे उप वनसंरक्षक कार्यालय आलापल्ली या ठिकाणी वनपाल या पदावर नियुक्त झाले होते. त्यांना बढती मिळून वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत होते. आलापल्ली, सिरोंचा वन विभागातील चामोर्शी, पेडीगुडम (मुलचेरा), कमलापूर या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले होते.

वन परिक्षेत्र अधिकारी असतांना त्यांनी अधिकारी असल्याचा कधीच देखावा केला नाही. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सौजन्याने वागत होते. सामाजिक कार्यात अग्रेसर होते. कुठल्याही सुखा दुख:त हिरीहिरीने सहभाग नोंदवीत होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव शिस्तप्रिय असल्याने त्यांची ओळख समाजात चांगली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर नवयुवकांना चांगले मार्गदर्शन करण्यासाठी ते रोज सकाळ सायंकाळ धडे देत होते. एवढेच नव्हे तर सेवानिवृत्त झालेले सायंकाळी एकत्र येवून रोजच परिसंवाद कार्यक्रम घेत होते.

दादाजी दुर्गेयांच्या पश्चात पत्नी, दोन मुल आणि दोन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहे. हसत्या खेळत्या परिवारात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. दादाजी दुर्गे यांच्या निधनाची माहिती मिळताच अल्लापल्ली शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.