महसूल मंत्री बावनकुळे आज गडचिरोलीत; महसूल विभागासह विविध कामकाजाचा सविस्तर आढावा..

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचीही उपस्थिती...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : राज्याचे महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी व भूमी अभिलेख मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज, शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून महसूल प्रशासनाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील नागरिकांची प्रत्यक्ष निवेदने स्विकारणार असून महसूल खात्याच्या विविध शाखांची कार्यपद्धती व प्रलंबित प्रश्‍नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करतील.

महसूल मंत्र्यांचा अधिकृत दौरा पुढीलप्रमाणे आहे :

सकाळी १२ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची निवेदने स्विकारण्यात येतील. दुपारी १ ते २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा, त्यानंतर २.३० ते ३.३० मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा आणि ३.३० ते ४.३० भूमी अभिलेख विभागाचा सखोल आढावा घेण्यात येणार आहे. संध्याकाळी ५ वाजता महसूल मंत्री पत्रकारांशी संवाद साधतील, तर ५.३० ते ७ या वेळेत धानोरा रोडवरील महाराजा लॉन्स येथे विशेष बैठक आणि अन्य कार्यक्रमांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, तसेच कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा देखील याच दिवशी ठरला आहे. ते सकाळी ११.४५ वाजता गडचिरोलीत दाखल होतील. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्र्यांसमवेत नागरिकांच्या निवेदन स्वीकृती कार्यक्रमास हजर राहतील. त्यानंतर १.३० वाजता प्रशासकीय कामकाजाच्या आढावा बैठकीत सहभागी होतील. संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेस उपस्थित राहून, ५.३० ते ७:०० या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे जिल्हास्तरीय चर्चा व बैठकांसाठी वेळ राखीव आहे. रात्री ते गडचिरोलीत मुक्काम करतील.

राज्यातील महसूल व प्रशासकीय कामकाजावर थेट देखरेख ठेवण्यासाठी मंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित महसूल विषय, भूमी अभिलेखातील अडचणी, तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील प्रकरणांना गती देण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments (0)
Add Comment