लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: महसूल विभागाच्या सेवाभावाची प्रत्यक्ष प्रचिती देणाऱ्या महसूल सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन आज अहेरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सादगी आणि उत्साहात संपन्न झाले.
एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सप्ताहात महसूल प्रशासनाकडून विविध विधायक उपक्रम राबवून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तहसीलदार तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल दिनाच्या निमित्ताने संपूर्ण सप्ताहभर नियोजित कार्यक्रमांची मालिका राबविण्यात येणार असून, महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान व त्यांच्या कार्याचा गौरव हाही या उपक्रमाचा मुख्य उद्देश राहणार आहे.
आज दि, २ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवर २०११ पूर्वीपासून निवासी कारणासाठी अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांपैकी पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडणार असून, या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचे दीर्घकालीन स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे. तीन ऑगस्टला महसूल विभागाच्या क्षेत्रीय जबाबदारीचा एक भाग म्हणून पानंद व शिवार रस्त्यांची मोजणी करण्यात येईल आणि या रस्त्यांच्या दुतर्फा पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चार ऑगस्टला “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत प्रत्येक मंडळ स्तरावर जनजागृतीसह महसूल जागराचा उपक्रम पार पडेल. पाच ऑगस्टला सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजनांतर्गत डीबीटी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी महसूल अधिकारी भेट देतील आणि त्यांच्या अडचणी दूर करून लाभ सुनिश्चित करतील.
सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची स्थिती विश्लेषित करून निष्कर्षित कारवाई केली जाईल, तर सात ऑगस्टला शासन धोरणांची अंमलबजावणी करत महसूल सप्ताहाचा समारोप होईल. या सप्ताहात महसूल विभाग आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत व्हावा आणि विभागाने लोकसेवा ही खरी मूल्यमापन कसोटी म्हणून स्वीकारावी, अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार नरेंद्र दाते, गुणवंत वाबितकर, कल्पना सुरपाम, मनोरमा जंगी, व्यंकट वैरागडे आणि मंडळ अधिकारी चीलंकर यांच्यासह तहसीलमधील विविध अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवंत बाबीतकर यांनी केले तर संचालन एकनाथ चांदेकर यांनी पार पाडले. यावेळी गौतम गजभिये व संतोष श्रीरामे या मंडळ अधिकाऱ्यांनी देखील आपले मार्गदर्शन मांडले. महसूल सप्ताह हा केवळ एक प्रशासकीय औपचारिकता न राहता, तो जनतेच्या अधिकारांची आणि सेवाधर्मी प्रशासनाच्या बांधिलकीची जिवंत खूण व्हावी, असा सूर कार्यक्रमात उमटत राहिला.