पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या कोल्हापूरातील ऋषिकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

कोल्हापूर दि. 16 नोव्हेंबर: जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी युद्धबंदी कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले. या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र सीमेवर शहीद झाले आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त होते आहे.

ऋषीकेश यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सैन्यात जाण्यास विरोध केला होता. मात्र २०१८ मध्ये एकदा प्रयत्न करतो म्हणून त्यांनी घरातल्यांची समजूत काढली. पहिल्याच प्रयत्नात ऋषीकेश हे सैन्यात भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाली. गेल्या बुधवारी ऋषिकेश यांचा त्यांच्या वडिलांसोबत फोनवरुन संवाद झाला होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांना गोळीबाराचा आवाज ऐकू गेला. ऋषिकेश यांना एक लहान बहीण आहे. आज भाऊबीजेचा दिवस हा भावाला ओवाळण्याचा दिवस. भाऊबीजेच्या दिवशीच ऋषीकेश जोंधळे यांना त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी आणण्यात आलं. यांच्या  चितेला त्यांच्या चुलत भावाने अग्नी दिला. या वीराला निरोप देताना संपूर्ण गाव अश्रूंच्या शोकसागरात बुडालं आहे.