लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात ग्रामीण मत्स्यपालन उद्योजकता विकास केंद्राचे आज भव्य उद्घाटन करण्यात आले. जलजीविका केंद्र पुणे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले हे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व उद्योजकतेला नवे दालन उघडणारे ठरणार आहे.
या सोहळ्याला सुमारे शंभराहून अधिक शेतकरी, मत्स्यपालक, महिला बचतगट, युवक तसेच उमेद, जिल्हा उद्योग केंद्र, अग्रणी बँका आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्घाटन अधिष्ठाता, मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर डॉ. सचिन बोंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. गुरुदास कामडी, अधिष्ठाता डॉ. प्रशांत तेलवेकर, जलजीविका पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ मिश्रा, तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय समीर डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ग्रामीण मत्स्यपालन उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली तर्फे तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व ओपन सोर्स संकेतस्थळाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. हे संकेतस्थळ मत्स्यपालक, शेतकरी उत्पादक संस्था, महिला बचतगट, स्टार्टअप्स व इतर लाभधारकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाची वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करताना मत्स्यपालन क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि शासकीय योजनांची माहिती दिली. डॉ. प्रशांत तेलवेकर यांनी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे योगदान स्पष्ट केले, तर नीलकंठ मिश्रा यांनी ग्रामीण मत्स्यपालन उद्योजकता विकास केंद्राचे उद्दिष्ट व भावी योजना सविस्तर मांडल्या.
संवाद सत्रात महिला बचतगट, उमेद, माविम, बँक प्रतिनिधी आणि शेतकरी सहभागी झाले. या सत्रात सल्लागार (मत्स्यपालन) जलजीविका पुणे समीर परवेज यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्य कार्यक्रम अधिकारी स्वप्निल गिरडे, वैज्ञानिक अधिकारी गंधर्व पिलारे आणि विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राची संपूर्ण चमू यांचे योगदान मोलाचे ठरले. सूत्रसंचालन रेमा तावडे व अंकिता पाटील यांनी केले, तर दामिनी अखंड यांनी आभार मानले.
या केंद्रामुळे गडचिरोलीत नवे मत्स्य उद्योजक घडतील, ग्रामीण युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील आणि जिल्हा मत्स्यपालन क्षेत्रात आदर्श ठरेल, अशी ठाम अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.