लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 : वनांचे रक्षण, वन्यजीवांचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या वनरक्षकांचा संघर्ष हा केवळ कर्तव्यापुरता मर्यादित नसून तो राष्ट्रसेवेचा सर्वोच्च आदर्श आहे. या शौर्यपूर्ण कार्यात हौतात्म्य पत्करलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या स्मृतीला सलाम करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी आल्लापल्ली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात वन शहीद दिन साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहीद वीरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. वन जमिनीवरील अतिक्रमण, अवैध वृक्षतोड, वन्यजीव तस्करी आणि जंगलातील आगीसारख्या संकटांचा सामना करताना स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या वनरक्षकांचे धैर्य व बलिदान अधोरेखित करण्यात आले. दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांत हुतात्मा झालेल्या वनरक्षकांनाही या प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
वनाचे रक्षण म्हणजे केवळ झाडे वाचविणे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे भविष्य सुरक्षित करणे होय. शहीद वनरक्षकांच्या रक्ताने सिंचित झालेली ही हिरवीगार वनश्री आज आपल्याला जीवनदायी ठरत आहे,असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास आल्लापल्लीचे उपवनसंरक्षक दीपाली तलमले, भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, सिरोंच्याचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, परिविक्षाधीन आयएफएस अधिकारी मोहम्मद आझाद व विष्णू रेड्डी, तसेच एसीएफ पवार, रामटेके, बाळापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके, गौरव गणवीर, नारायण इंगळे, गडमाडे आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थ, वनप्रेमी व सामाजिक बांधवांनीही या कार्यक्रमात सहभाग घेऊन वनसंरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना आदरांजली वाहिली. त्यांच्या सहभागामुळे वनरक्षकांच्या बलिदानाची जाणिव अधिक व्यापक झाली.
सभागृहात उमटणारे वनरक्षकांचा संघर्ष अमर राहो हे स्वर केवळ श्रद्धांजलीचे नव्हते, तर वनरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा समाजाचा दृढ संकल्पही होते. दिल्लीतील तसेच गडचिरोलीसारख्या जंगलपट्टीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांच्या आठवणीने हा दिन प्रेरणादायी ठरला.