12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ 01 फेब्रुवारी:- राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं आहे. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत.
मुलांना लस म्हणून सॅनिटीझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ लस दिली. अचानक मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे12 बालकांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुलांच्या पालकांनी घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. सॅनिटायझर पाजलेल्या 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. संपूर्ण प्रकार गंभीर असून यात कोणाकडून ही चूक झाली याची चौकशी सुरू आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.