लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला निष्ठेने आणि सातत्याने चालना देणारे कार्यकर्ते संतोष चिकाटे यांना ‘शतकवीर कार्यकर्ता पुरस्कार-२०२५’ जाहीर करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारधारेचे सातत्याने प्रसार व प्रचार करणाऱ्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’च्या कार्यात त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.
पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांनी दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. हा पुरस्कार शहादा (जि. नंदुरबार) येथे होणाऱ्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी संतोष चिकाटे यांना शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी शहादा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीची खातरजमा करण्यासाठी अजय भालकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
संतोष चिकाटे हे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील अंनिसचे कार्यकर्ते असून, त्यांनी गावागावांत जाऊन अंधश्रद्धा विरोधी विचार पोहोचवण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात येत असल्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
संपादक मंडळात डॉ. नितीन शिंदे (संपादक), माधव बावगे (कार्याध्यक्ष) आणि अविनाश पाटील (अध्यक्ष, कार्यकारी समिती) यांचा समावेश असून, या पुरस्काराची घोषणा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.