कोरोना रुग्णांसाठी सरसावले कोरची वासीय; दोन लाखांवर केला निधी गोळा

  • कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि. २९ एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळेवर ऑक्सिजन आणि ईतर सुविधा न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राणास मुकावे लागत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत कोरची तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी कोविड वारियर्स ग्रुप तयार करून त्या माध्यमातून सीसीसी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी दोन ऑक्सीजन मशीन आणि ईतर साहित्य सीसीसी रुग्णालयाला भेट दिल्याने ऑक्सीजन बेडची सोय झाली आहे.

तालुका आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाच्या वतीने आदिवासी वसतिगृह मुलींच्या वस्तीगृहात सीसीसी कोविड केअर केंद्राची उभारणी करण्यात आली. कोरोना विषाणूची दुसरी लाट थोपवून धरण्यासाठी तालुका पातळीवर हे १०० खाटांचे केंद्र सुरू केले.  मात्र दोनच ऑक्सीजन बेड ची व्यवस्था शासनाने केली होती.  यामुळे अडचणी येत होत्या. राज्यभरात असलेल्या रुग्णालयात खाटांचा व ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे वाढत असलेल्या कोरोना रुग्णांना कोरची वरुन १२० किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली ला रेफर केले जात होते.

ही बाब तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नसरुद्दीन भामानी, मनोज अग्रवाल, भुमेशवर शेंडे, घनश्याम अग्रवाल, नंदकिशोर वैरागडे, सुरज हेमके, किशोर साखरे, मुरलीधर रुखमोडे, आदी कार्यकर्त्यांच्या लक्षात आली, तालुक्यात कोरोना चा झपाट्याने होत असलेला प्रसार लक्षात घेता, या अडचणीवर मात करण्यासाठी स्थानिक कोरची येथील कोरची समाचार व्हाट्सअप ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली आणि या चर्चेतून कोविड वारियर्स संघटना स्थापन करण्यात आली. यात तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सीसीसी रुग्णालयात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आपापल्या परीने मदत केली.

आजपर्यंत दोन लाखावर निधी गोळा झाली असून त्या जमा झालेल्या निधी मधून सीसीसी रुग्णालयाला दोन ऑक्सीजन मशीन, रुग्णांना गरम पाणी करण्याचे तीन जग, सीसीसी रुग्णालयात सॅनिटायझर करण्यासाठी स्प्रे पंप, आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात बीघाड असलेली विद्धुत पुरवठा दुरुस्ती करून दिली, त्यामुळे आता सीसीसी रुग्णालयातील व्यवस्थेत सुधारणा झाली असून दोन ऑक्सीजन बेडची भर पडली.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. अशात समाजाचे ऋण फेडण्यासाठी या कोविड वारियर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली धडपड सर्वांना प्रेरणा देणारी आहे. एकत्रितपणे एखाद्या समस्येविरोधात लढल्यास नक्कीच मार्ग निघतो हे यावरुन सिद्ध झाले. तालुक्यातील कोडगुल, बेतकाठी, मसेली,बेडगाव,कोटरा बेलगाव घाट, आदी गावाच्या परिसरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेकांना ऑक्सिजन ची आवश्यकता भासत आहे. तालुक्यातील एकही खाजगी रुग्णालयात नाही. या तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या खुप मोठा प्रमाणात  आहेत. दोन ऑक्सीजन बेड झालेली कोविड केअर केंद्रात झालेली ही सोय अनेकांना जीवन रक्षक ठरणार आहे यात शंका नाही.

Collector Dipak SinglaKorchi hospital