लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, १३ : आदिवासी नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी भारत सरकारने पुकारलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान (DA JUGA) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ४११ गावांमध्ये भव्य ‘संतृप्ती शिबिरांचे’ आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम दिनांक १५ जून ते ३० जून २०२५ दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, यामार्फत आदिवासी समाजाच्या दारापर्यंत शासनाच्या सेवा व लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
या शिबिरांचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जमातीच्या घटकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती, नोंदणी आणि प्रत्यक्ष सेवा एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून देणे. शिबिरांमध्ये सरकारी सेवा थेट गावकऱ्यांच्या दारी पोहोचवण्यात येणार आहेत.
शिबिरांमध्ये मिळणाऱ्या मोफत सेवा:
▪️ नवीन आधार कार्ड नोंदणी व सुधारणा
▪️ मतदार ओळखपत्राची नोंदणी व अपडेट
▪️ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
▪️ मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड
▪️ रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती
▪️ नवीन बँक खाती उघडणे
▪️ व्यक्तिगत वनहक्क दावे स्वीकारणे
▪️ आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान कार्ड, किसान क्रेडीट कार्ड
▪️ प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज स्वीकारणे
▪️ वनधन विकास केंद्राशी संबंधित लाभ
▪️ सौरऊर्जा व LPG गॅस कनेक्शनसाठी अर्ज
▪️ विमा योजना नोंदणी
▪️ सिकलसेल व अॅनेमिया तपासणी (आरोग्य विभागामार्फत)
लोकसहभाग आवश्यक
सदर उपक्रमांतर्गत आदिवासी बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी केले आहे.