१६ जूनपासून ‘शाळा प्रवेशोत्सव’; नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात सुरुवात!

राज्यभरात मान्यवरांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे होणार स्वागत...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. १३ : ‘शाळा ही ज्ञानाचे मंदिर असते’ याच भावनेने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात राज्यात उत्साहात होणार आहे. विदर्भ वगळता इतर सर्व विभागांमध्ये सोमवार, १६ जून २०२५ पासून शाळा सुरू होणार असून, विदर्भातील शाळांना २३ जूनपासून सुरुवात होईल. शाळेच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. राज्यभरातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हा उपक्रम जल्लोषात पार पडणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.

‘प्रवेशोत्सव’ उपक्रमामुळे समाजाची शाळेकडे सकारात्मक वळण..

नव्या वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांचा शाळेच्या दिशेने ओढा वाढावा आणि स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा कल बळकट व्हावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी तसेच राज्याच्या वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.त्यांच्या उपस्थितीत मोफत पाठ्यपुस्तक वितरण, शालेय गणवेश, पोषण आहार, खेळाच्या व स्वच्छतेच्या सुविधा, शाळा व्यवस्थापन समित्यांशी चर्चा आणि शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून शाळा व्यवस्थापन, ग्रामपंचायत सदस्य, पालक आणि शिक्षक यांचा समन्वय साधून एकात्मिक विकासाकडे वाटचाल होणार आहे.

शिक्षण विभागाची कटिबद्धता : निपूण महाराष्ट्र अभियानाचा सहभाग..

‘निपूण महाराष्ट्र अभियान’ हे राज्यातील एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक अभियान असून, दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व अध्ययन कौशल्य विकसित करणे हे त्याचे ध्येय आहे. ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या इयत्तेनुसार अध्ययनक्षम बनावेत, यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अभियानात पालकांचा विश्वास वाढावा यासाठी शासकीय सचिवांनी शाळा दत्तक घेऊन त्यांच्या कार्यक्षमतेत भर घालण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मुख्य सचिव आणि शिक्षण सचिवांकडून थेट आढावा..

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अलीकडेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ‘प्रवेशोत्सव’ संदर्भात आढावा बैठक घेऊन शाळा भेटीचे निर्देश दिले आहेत. तसेच शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी अधिकाऱ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून दर्जेदार शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट केले.

त्यांनी म्हटले की, “या भेटींमुळे समाज, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल. बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होण्याची संधी मिळेल आणि राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उंचावेल.”

School dressschool opning