जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नानाजी वाढई यांची निवड

- ६ जानेवारीला पत्रकार दिनी नानाजी यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २ जानेवारी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुदायी, गुरूदेव सेवाश्रम मोझरी (अमरावती)चे आजीवन प्रचारक, दलित मित्र नानाजी वाढई यांची यंदाच्या गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. येत्या ६ जानेवारीला पत्रकार दिनी नानाजी यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवन येथे दुपारी २.३० वाजता होणाऱ्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मिना, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आणि गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंभारे हे राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी १०वाजता गीतगायन स्पर्धा होणार आहे. त्याचे बक्षीस वितरणही यावेळी होणार आहे. कोविड निर्बंधांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचे प्रेस क्लबच्या वतीने कळविण्यात आले.

स्वातंत्र्यलढा ते राष्ट्रसंतांचे प्रचारकार्य

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित ९१ वर्षीय नानाजी वाढई यांनी ७० वर्षांपेक्षा अधिक काळापासून गुरूदेव सेवा मंडळाच्या प्रचारकार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. १९४२ साली इंग्रजी राजवटीविरोधात उठलेल्या ‘चले जाओ’ आंदोलनाच्या वेळी शाळकरी विद्यार्थी असलेल्या नानाजींना ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ असे नारे देऊन मोठ्या लोकांच्या मोर्चाची नक्कल केल्यावरून इंग्रजी शिपायांचा लाठीमार खावा लागला होता.

पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी गुरूदेव सेवा मंडळाच्या कामात स्वत:ला वाहून घेतले. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करताना समाजातील अनिष्ठ रूढी, प्रथा, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, जातीभेद दूर करून निकोप समाजनिर्मितीच्या कामात नानाजींनी संपूर्ण विदर्भ पादाक्रांत केला.

त्यांच्या या त्याग आणि योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २००५-०६ या वर्षी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. याशिवाय महाराष्ट्र भूषण, मानवता पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले समाजसेवक पुरस्कार अशा राज्यातील अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आज वयाची नव्वदी पार केली असतानाही राष्ट्रसंतांचे भजन, कीर्तन, भाषणातून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरूच आहे.

हे देखील वाचा : 

पोलीस विभागामार्फत अतिदुर्गम भागातील १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे वाटप

 

 

 

lead newsnanaji wadhai