ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे निधन; पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक आवाज थांबला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड : जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. मुरूड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष, गेली दोन दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार किरण पितांबर बाथम (वय ५१) यांचे सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांवर शोककळा पसरली आहे.

बाथम यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्स रायगड आवृत्तीसह विविध वृत्तपत्रांत काम करताना स्थानिक प्रश्नांवर धारदार लेखणी चालवली. जनतेच्या समस्या मांडून लोकप्रतिनिधींना हादरवून सोडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य ठरले. त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांमध्येही कार्य करताना आपली ठसठशीत छाप उमटवली. राजकीय नेत्यांशी जवळीक असूनही त्यांनी स्वच्छ प्रतिमा आणि बंधनमुक्त पत्रकारिता अखेरपर्यंत जपली.

मुरूड हे त्यांचे मूळ गाव असले तरी अलिबाग व पनवेल हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. ते साईभक्त होते. पनवेलच्या साईदरबारात त्यांची नेहमी उपस्थिती असायची. पत्रकारितेतल्या प्रामाणिकतेसोबतच साधेपणा व नम्रता हे त्यांचे विशेष गुण होते.

किरण बाथम यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील पत्रकार समाजावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. मुरूड तालुका पत्रकार संघासह जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

https://youtube.com/shorts/-TYJWEM2OIo?feature=share