आलापल्लीच्या संघमित्रा बुद्ध विहारातील प्रवचन ,वर्षावास मालिकेचा शांततामय समारोप

त्रिपिटकाच्या मार्गदर्शनाखाली आत्मशुद्धी, शिक्षण आणि करुणेचा दीप उजळला....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

“वर्षवास हा पावसाळ्याचा काळ नसून, आत्मशुद्धीचा आणि समाजजागृतीचा ऋतू आहे — आणि आलापल्लीने यंदा या ऋतूला करुणेचा आणि ज्ञानाचा उत्सव बनवला.”

आलापल्ली : आलापल्ली नगरीत संघमित्रा बुद्ध विहारात गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेचा शांततामय आणि विचारप्रवर्तक समारोप झाला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली (दक्षिण) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.

आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणारा वर्षावास हा बौद्ध परंपरेतील अत्यंत पवित्र काळ मानला जातो. पावसाळ्याच्या या काळात तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला एकाच ठिकाणी राहून साधना, चिंतन आणि जनजागृतीचे कार्य करण्याचा निर्देश दिला होता. प्रवासाऐवजी आत्मपरीक्षण, वाचन, ध्यान आणि संघशिस्त यांना महत्त्व दिले जाते. ‘विनयपिटक’ आणि ‘सुत्तपिटक’ मधील तत्त्वांवर आधारित ही परंपरा आजही बौद्ध समाजाच्या आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे.

या वर्षवास कालावधीत आलापल्लीतील संघमित्रा बुद्ध विहारात महाराष्ट्र राज्य शाखेच्या मार्गदर्शनानुसार १९ विषयांवर प्रवचनमालिका राबविण्यात आली. बुद्धांचा सम्यक दृष्टिकोन, अष्टांगमार्ग, करुणा, अहिंसा आणि आंबेडकरी विचारातील समता व शिक्षणाचे मूल्य या विषयांवर प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी विचारवंतांनी प्रबोधनपर व्याख्याने दिली. प्रत्येक पौर्णिमा, उपोसथ दिवस आणि महापुरुषांच्या स्मृतिदिनानिमित्त हे प्रवचन लोकजागृतीचा दीप ठरले.

१२ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या सांगता समारंभात अध्यक्षस्थानी आद. कार्तिकजी निमसरकार (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आद. दामोधर राऊत (अध्यक्ष, भा. बौ. महासभा, गडचिरोली दक्षिण), आद. भीमराव झाडे (जिल्हा संघटक), आयु. सुमनताई निमसरकार (अध्यक्ष, महिला शाखा), मा. यमाजी मुंजमकर (मुख्याध्यापक), तसेच प्रमुख वक्ते सन्मा. कैलास बांबोळकर (चंद्रपूर), सन्मा. विष्णू सोनोने (प्राचार्य, शिक्षण महाविद्यालय, अहेरी), आणि डॉ. सुमती नैताम (वैद्यकीय अधिकारी) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आयु. शिलाताई चालूरकर आणि आयु. कल्पना वाघमारे यांच्या स्वागतगीताने झाली, तर जि.प. शाळा छलेवाडा येथील विद्यार्थ्यांनी “तथागत वंदन गीत” वर सादर केलेल्या नृत्याने वातावरण करुणा आणि श्रद्धेने भारावले. प्रवचन मालिकेतील मान्यवर वक्त्यांचा सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

बुद्ध धम्मज्ञान परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्मृतिशेष सुखदेव दुर्योधन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयु. अमोल दुर्योधन यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह दिले. तसेच स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिके — आद. विठ्ठल भसारकर (रु.१५००/-), कु. युवाशी व आदित्य ढोलगे (रु.१०००/-) आणि देविदास वाघमारे (रु.५००/-) यांच्या हस्ते देण्यात आली.

महिला शाखेच्या वतीने मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन आयु. स्मिता रामटेके (मेश्राम) यांनी उत्साहवर्धक पद्धतीने केले, तर प्रास्ताविक आयु. सचिन कांबळे यांनी सादर केले. शेवटी आयु. जशीका करमे यांनी आभार प्रदर्शन केले.

समारोपानंतर स्मारक समितीच्या वतीने भोजनदान आणि भजनसंध्या कार्यक्रमाने वर्षवासाचा औपचारिक समारोप झाला. तथागत बुद्धांच्या त्रिशरण, अष्टांगमार्ग आणि पंचशील या तत्त्वांच्या स्मरणाने संपूर्ण विहार परिसर प्रबुद्धतेने उजळला.

हा समारोप केवळ धार्मिक विधी नव्हता, तर धम्माच्या सामाजिक रूपाचा उत्सव होता — जिथे श्रद्धा आणि समाजसेवा, साधना आणि शिक्षण, करुणा आणि विवेक या साऱ्या मूल्यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आलापल्लीसारख्या दुर्गम भागात घडलेला हा अध्यात्मिक सोहळा बौद्ध धम्माच्या सातत्याची, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या मानवमुक्तीच्या धम्मक्रांतीची सजीव साक्ष ठरला.

Comments (0)
Add Comment