छत्रीवाटपाच्या माध्यमातून ‘सावलीचा आधार’; आ. धर्मरावबाबा आत्राम, राहुल डांगे यांच्या सहकार्याने आष्टीत संवेदनशील उपक्रम

शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनाही दिल्या छत्र्या; शिक्षण आणि सामाजिक भानाची सांगड घालणारा उपक्रम....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २ ऑगस्ट:

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांच्या सहकार्याने आज आष्टी येथील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत एक संवेदनशील आणि लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांनाही छत्र्यांचे वाटप करून ‘सावलीचा आधार’ देणारा हा कार्यक्रम शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणारा ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल डांगे होते. ममताताई डांगे, राखीताई मडावी, सरोजाताई बोंडे, मुख्याध्यापिका एस. डी. गलबले, एम. यू. खोब्रागडे (पदविधर अध्यापक), चंद्रवैभव आत्राम आणि नितीन सेडमाके या मान्यवरांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विशेषतः गावातील काही पालक व नागरिकांनाही छत्र्या देण्यात आल्या, ज्यामुळे शाळा आणि समाज यामधील संवाद आणि सहकार्याचे बंध अधिक दृढ झाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात राहुल डांगे यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली. “अशा उपक्रमांमधून समाज आणि शासन यांच्यातील सेतू अधिक भक्कम होतो. शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेला एकत्र ठेवणारी ही प्रक्रिया परिवर्तनाचा पाया ठरते,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय. एम. शेरेकर गुरुजी यांनी ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन पी. टी. वाकडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात बि. ए. क्षिरसागर, टी. एम. मल्लेलवार, के. आर. मसराम यांच्यासह संपूर्ण शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.