लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भाग ५
गडचिरोली/चंद्रपूर : राज्यभरात वादग्रस्त ठरलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा विषारी विस्तार आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. सिंदेवाही तालुक्यातील एका शाळेतील लिपिकाने संस्थाचालकांना डिजिटल सुविधा आणि शिक्षक भरतीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केली, तर गडचिरोलीतील दुसऱ्या लिपिकाने शिक्षण संस्थेशी थेट संगनमत साधून कोट्यवधींची मालमत्ता उभी केल्याचा स्फोटक प्रकार समोर येत आहे.
या लिपिकांची कार्यशैली स्पष्ट — “काम करून देतो”, “शालार्थमध्ये सुधारणा करून देतो”, “भरती मंजूर करून देतो”, अशा वाक्यांच्या आड संस्थाचालकांची फसवणूक. कोणी विरोध केला, तर मागील व्यवहार उघड करण्याची धमकी. कोणी गप्प बसले, तर अधिक पैसे उकळण्याचा तगादा. काही सुजाण संस्थाचालकांनी वेळेत सावध होऊन संबंध तोडले, पण बरेच जण अजूनही या दलालांच्या जाळ्यात अडकले आहेत.
गडचिरोलीतील एका संस्थेच्या लिपिकाविरोधात पूर्वीच एका सुजाण नागरिकाने तक्रार केली होती. त्याचप्रमाणे चंद्रपूरमधील लिपिकावरही एका लोकप्रतिनिधीने थेट कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपताच संबंधित लिपिकांनी पुन्हा नव्याने दलालीचा डाव पुकारला. आता ते दोघेही खुलेआम शाळा-कार्यालयांत वावरत आहेत. शासकीय प्रक्रियेतील ‘डिजिटल विंडो’ त्यांच्या साखळीत सामील असून, त्यातूनच शिक्षक बदल, शालार्थ डेटामध्ये फेरबदल, भरती प्रक्रियेतील ‘पॉवर ब्रोकर’ची भूमिका बजावत आहेत.
दक्षिण गडचिरोलीत फक्त सहा महिन्यांत निवृत्त होणाऱ्या एका क्लार्क च्या ओळखीचा वापर करून या लिपिकाने एका संस्थेचा आंतरिक डेटा मिळवला. मग बदल्यांचं आमिष, बनावट मंजुरीचे दस्तऐवज, आणि बोगस खात्यांत रक्कम वर्ग करत लाखो रुपये हातोहात जमवले. तर चंद्रपुरातील शिक्षण खात्यातील काही अधिकाऱ्यांनीच प्रश्न उपस्थित केला — “सामान्य लिपिकाच्या नावावर एवढी संपत्ती कोठून आली?”
यात अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या दोघा लिपिकांनी जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरले असून, त्यांच्या माध्यमातून शासकीय संरक्षणाचा बुरखा घेऊन ही सगळी आर्थिक लूट राबवली जात आहे. यामध्ये किती अधिकारी सामील आहेत, किती संस्थाचालकांनी तडजोड केली आहे — याचा तपशीलवार तपास प्रशासनासमोर एक मोठं आव्हान बनून उभा आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या लिपिकांनी ‘बाहेरच्या बाहेर’ व्यवहार करत अनेक उमेदवारांची फसवणूक केली. काही उमेदवार आजही भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्यांच्या नावावर व्यवहार आधीच पार पडले गेलेत — हे आता उघड होतं आहे.
संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू म्हणजे शिक्षणासारख्या पवित्र व्यवस्थेचा घात. दलालगिरी, बनावट आयडी, पैसे फेकून मिळवलेली नोकर्या — यामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राची प्रतिमा गडद झाली आहे. ही फक्त दोन लिपिकांची कहाणी नाही, तर संपूर्ण यंत्रणेतील एका सडलेल्या भागाची साक्ष.
या दोघा लिपिकांसह, त्यांना पाठीशी घालणारे सर्व कर्मचारी, दलाल, अधिकारी आणि गुप्त हात यांचा खचाखच तपास होणं अत्यावश्यक आहे. अन्यथा शालार्थचं हे दलालमंडळ शिक्षण व्यवस्थेच्या मुळावरच उठेल — आणि त्याचे गंभीर परिणाम केवळ उमेदवारांवर नव्हे, तर समस्त समाजावर होतील.
सायकलवरून सुरू झालेला प्रवास… आता शिक्षणाच्या साम्राज्याचा अधिपती?