लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
परभणी, 24, सप्टेंबर :- परभणीच्या दौऱ्यावर असलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार याना आज शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परभणीचा पुन्हा एकदा अनुदान यादीत समावेश करावा ,य व इतर काही मागण्यासाठी शिवसैनिक आग्रही होते. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज परभणीत विविध कार्यक्रम होते. पूर्णा येथे एका कार्यक्रमासाठी जात असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी सत्तार यांचा ताफा अडवला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हाय हायच्या घोषणाही दिल्या. शिवसेनेने केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ शिवसैनिकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तार यांनी गाडीतून खाली उतरून शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांच्या मागण्यांचं निवेदनही स्वीकारलं. कृषी मंत्र्यांनी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, अनुदान यादीत परभणीचा पुन्हा एकदा समावेश करावा, आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे यावेळी काही काळ वातावरण तंग झालं होतं.
हे देखील वाचा :-
लम्पि चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश.