धक्कादायक! डोंबिवलीतील कामगार वसाहतीत भीषण आग; 170 घरं जळून खाक तर एकाचा होरपळून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 21 फेब्रुवारी: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अनेक किलोमीटर अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एक कामगार गंभीर जखमी असल्याचंही समजलं आहे.

आज सकाळी अचानक लेबर कॅम्पला लागलेल्या या आगीत अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्या शेकडो कामगारांना बेघर व्हाव लागलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या दुर्दैवी घटनेनंतर आग आटोक्यात आणली असून परिसर थंड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डोंबिवलीतील कल्याण शील रोडवर एक बहुमजली इमारतीचं काम चालू आहे. ज्यामध्ये अनेक मजूर काम करीत होते. तसेच त्यांना राहण्यासाठी याठिकाणी सुमारे 200 घरं बांधण्यात आली होती. पण या आगीत अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत 170 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे अनेक सिलिंडर्सचे स्फोटही झाले आहेत. या क्षणी आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे. तसेच कुलींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लेबर कॅम्पला लागलेल्या आगीत आणखी जीवितहानी झाली आहे का? किंवा इतर कोणताही कामगार या आगीत सापडला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

Fire