धक्कादायक! रेमडेसिवीर चोरी प्रकरणात गडचिरोली सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला बेलतरोडी पोलिसांनी केली अटक

  • १२ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करून नागपुरात जावयाला दिले होते विकायला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ एप्रिल: गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिका पल्लवी मेश्राम (३५) हिने दोन आठवड्यांपूर्वी तब्बल १२ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करून काळाबाजार करणाऱ्या टोळीला सोपविले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी परिचारिकेला बेलतरोडी पोलिसांनी अटक करून नागपूरला आणले आहे. रेमडेसिवीरच्या कृत्रिम टंचाईने गडचिरोलीसारख्या जिल्ह्याच्या सरकारी रुग्णालयातही सुरुंग लावल्याचे स्पष्ट झाले आहे.    

याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून ५ आरोपींना अटक केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी नवीन डायमंड नगर नंदनवन येथील मनोज वामनराव कांबळे (४०), अनिल वल्लभदास कांकानी (५२) टेलिफोन एक्सचेंज चौक, पृथ्वीराज देवेंद्र मुळीक (३६), रा. रहाटे कॉलनी, अश्विन देवेंद्र शर्मा (३२) रा. गावंडे लेआउट नरेंद्रनगर, अतुल भीमराव वाडके (३६) आयुर्वेदिक लेआउट एनआयटी कॉम्प्लेक्स यांना अटक केली होती.          

या टोळीकडून ७ रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत नगरसेविकेच्या दीर असलेला मनोज कांबळे आणि कंत्राटदार वाडके हे दोघे या टोळीचे सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली मात्र हे भामटे तोंड उघडायला तयार नव्हते.

पोलिसांनी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच या प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आरोपी वाळके याची साळी पल्लवी मेश्राम हि गडचिरोली सामान्य रुग्णालयात ८ वर्षापासून कार्यरत आहे. तिच्या मार्फतीने १२ इंजेक्शन आरोपींनी प्राप्त केले असल्याची माहिती दिली. या टोळीने ५ इंजेक्शन दिल्ली येथील रुग्णाला एका लाखात विकले होते. उरलेल्या इंजेक्शनसाठी ग्राहकाचा शोध सुरु होता. या दरम्यान पोलिसांनी टोळीला पकडले. आरोपीच्या चौकशीनंतर पल्लवी हिने आरोपींना इंजेक्शन सोपविले असल्याची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचे पथक गडचिरोलीत पोहोचले तेथून त्यांनी पल्लवीला ताब्यात घेतले. रविवारी हे पथक पल्लवीला घेऊन नागपुरात आले तिने रेमडेसिविर इंजेक्शन चोरीची कबुली दिल्याचे समजते.

पल्लवीला बेलतरोडी पोलीस आज न्यायालयात हजर करून पोलीस कोटडीची मागणी करणार आहे. त्यामुळे या रॅकेट मध्ये पुन्हा कोणा कोणाचे लागे बांधे आहे. हे पोलीस चौकशी नंतरच स्पष्ट होणार  आहे.

Beltarodi PoliceGadchiroli General Hospital